घरकुलातील अखरेच्या 32 सदनिकांचे वितरण

पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने, केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्याने चिखली सेक्टर क्रमांक 17 व 19 येथे जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशनअंतर्गत आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरकुल हा गृहप्रकल्प उभारण्यात आला आहे. त्या गृहप्रकल्पातील अखेरच्या 32 सदनिकांसाठीची संगणकीय सोडत चिंचवड येथे काढण्यात आली. यावेळी कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे, उपअभियंता सुनील दांगडे, माहिती व तंत्रज्ञान अधिकारी उज्ज्वला गोडसे, मुख्य लिपिक सुनील माने, दिलीप वाघमोडे, योगिता जाधव, कुणाल डोळस, सूरज लखन, मंगेश पजई यांच्यासह लाभार्थी उपस्थित होते.
महापालिका प्रशासनाने पुनर्वसन कार्यात गती आणत अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवले आहे. या प्रकल्पामध्ये 158 इमारती उभारण्यात आल्या असून, प्रत्येक इमारतीत 42 सदनिका आहेत. आतापर्यंत 6 हजार 636 पैकी 6 हजार 602 सदनिकांचे वितरण पूर्ण झाले आहे. प्रकल्पातील विविध इमारतींमध्ये रिक्त असलेल्या सदनिकांची सोडत आज झाली. गृहप्रकल्पातील सदनिकांच्या वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
उपायुक्त अण्णा बनसोडे म्हणाले की, महापालिकेने दिलेल्या घरकुलातील सदनिकांच्या लाभामुळे लाभार्थ्यांचे स्वतःच्या घराचे स्वप्न साकार झाले आहे. त्याचा वापर योग्य करावा. सदनिका भाड्याने देऊ नयेत व परिसर स्वच्छ ठेवावा.



