
पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
प्रभाग क्र. २८, पिंपळे सौदागर (गावठाण) येथील महापालिका दवाखान्यास “माता रमाई आंबेडकर” असे नाव देण्यात यावे, अशी मागणी मा. विरोधी पक्षनेते तथा नगरसेवक विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी क्षेत्रीय अधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
स्थानिक नागरिकांसाठी महत्त्वपूर्ण आरोग्यसेवा देणारा हा दवाखाना परिसराचा केंद्रबिंदू असून, त्याला प्रेरणादायी व्यक्तिमत्त्वाचे नाव देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. माता रमाई आंबेडकर यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना साथ देत समाजकार्यात मोलाचे योगदान दिले. त्यांच्या त्याग, संयम आणि समाजाप्रती असलेल्या निष्ठेमुळे त्या आजही प्रेरणास्थान मानल्या जातात.
दवाखान्यास त्यांचे नाव दिल्यास त्यांच्या कार्याचा सन्मान होईल तसेच नागरिकांमध्ये सामाजिक जाणीव आणि प्रेरणा निर्माण होईल, असेही निवेदनात म्हटले आहे. सदर मागणीचा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.



