
पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत विरोधी पक्षनेतेपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांची अधिकृत निवड जाहीर करण्यात आली आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या पार्श्वभूमीवर सक्षम, अनुभवी आणि प्रशासनावर ठाम पकड असलेल्या नेतृत्वाची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 37 नगरसेवक निवडून आले आहेत. मात्र भाजपने 84 नगरसेवकांच्या बळावर सत्ता स्थापन करत महापौरपदही मिळवले आहे. त्यामुळे महापालिकेत प्रभावी विरोधी पक्षनेते असणे आवश्यक होते. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसने भाऊसाहेब भोईर यांच्यावर विश्वास टाकला आहे.
भाऊसाहेब भोईर हे गेल्या 30 ते 35 वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहराच्या राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी सलग पाच वेळा नगरसेवक म्हणून निवडणूक जिंकली असून, महापालिकेतील प्रशासन, कामकाज पद्धती आणि धोरणांची त्यांना सखोल माहिती आहे. प्रशासनावर मजबूत पकड, तसेच आक्रमक पण संतुलित भूमिका ही त्यांची ओळख मानली जाते.
सभागृहात सत्ताधाऱ्यांना जाब विचारणे, जनतेचे प्रश्न ठामपणे मांडणे आणि महापालिकेतील लोकशाही अधिक बळकट करणे, ही भूमिका भाऊसाहेब भोईर समर्थपणे पार पाडतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
भाऊसाहेब भोईर यांच्या नियुक्तीमुळे महापालिकेतील विरोधी पक्षाची भूमिका अधिक धारदार व आक्रमक होणार असून, सत्ताधाऱ्यांवर प्रभावी अंकुश राहील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.



