
पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड शहर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून शहरातील सर्वात पहिला पॅनल जाहीर करत प्रचाराचा शुभारंभ आज दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आला. प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर–रहाटणी येथे हा शुभारंभ सोहळा उत्साहात पार पडला.
या पॅनलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून
१) सर्वसाधारण पुरुष – विठ्ठल उर्फ नाना काटे,
२) सर्वसाधारण ओबीसी प्रवर्ग – मिनाक्षी अनिल काटे,
३) सर्वसाधारण महिला – शितलताई नाना काटे,
४) सर्वसाधारण महिला – सायली उमेश काटे यांचा समावेश आहे.
प्रचाराचा शुभारंभ अखंड हिंदुस्तानाचे आराध्यदैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. त्यानंतर पिंपळे सौदागरचे ग्रामदैवत श्री मुजोबां महाराज यांच्या मंदिरात श्रीफळ वाढवून प्रचारास प्रारंभ करण्यात आला. यानंतर पिंपळे सौदागर गावठाण परिसरातून पदयात्रेस सुरुवात करून संपूर्ण परिसरात भव्य प्रचारफेरी काढण्यात आली.
या प्रचारफेरीदरम्यान स्थानिक ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. पॅनलमधील उमेदवारांचे नागरिकांच्या वतीने जागोजागी औक्षण करण्यात आले. प्रचारफेरीला परिसरातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
यावेळी उपस्थित ग्रामस्थ व नागरिकांना संबोधित करताना पॅनल प्रमुख व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रचार प्रमुख, माजी विरोधी पक्षनेते श्री. विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी सांगितले की, “शहरातील सर्व प्रभागांमध्ये ५० टक्के आरक्षणानुसार दोन महिला व दोन पुरुष असे पॅनल असतात. मात्र पिंपरी-चिंचवड शहरातील एकमेव प्रभाग क्रमांक २८ पिंपळे सौदागर–रहाटणी येथे तीन महिला व एक पुरुष असा पॅनल राष्ट्रवादी काँग्रेसने दिला आहे. हा सामाजिक समतोल जपणारा पॅनल असून या पॅनलला संपूर्ण शहरात सर्वाधिक बहुमताने निवडून देण्याचे आवाहन आम्ही करतो.”
या प्रचार शुभारंभामुळे पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिका निवडणुकीच्या राजकीय वातावरणाला वेग आला असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या रणधुमाळीत आघाडी घेतल्याचे चित्र दिसून येत आहे.



