
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
थेरगाव प्रभाग क्रमांक २३ मधील राजकीय समीकरणे बदलणारी महत्त्वपूर्ण घडामोड म्हणून योगिता ताई महेश बारणे यांनी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे थेरगाव परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र राजकीय वर्तुळात पाहायला मिळत आहे.
यावेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष योगेश बहल, माजी आमदार विलास लांडे, पिंपरी चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी नगरसेवक व गटनेते कैलास बारणे, मा. शहराध्यक्ष अजित गव्हाणे, मा. विरोधी पक्षनेते संतोष बारणे, मा. नगरसेवक सतीश दरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
योगिता ताई बारणे या कॉम्प्युटर इंजिनियर असून त्या स्वतः बांधकाम व्यवसायात सक्रिय आहेत. आधुनिक शिक्षण, व्यावसायिक कौशल्य आणि सामाजिक जाणिवा यांचा संगम त्यांच्या कार्यपद्धतीत दिसून येतो. त्यांचे पती महेश बारणे हे देखील बांधकाम व्यवसायिक असून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून व्यवसायाचे धडे घेत वीटभट्टीपासून ते यशस्वी बांधकाम व्यावसायिक होईपर्यंतचा त्यांचा प्रवास प्रेरणादायी व थक्क करणारा आहे. थेरगाव परिसरात बारणे कुटुंबाचे व्यापक व्यावसायिक व सामाजिक नेटवर्क आहे.
योगिता ताई यांचे सासरे कै.सुदामराव बारणे हे हरिभक्त पारायण, उच्चशिक्षित आणि समाजमान्य व्यक्तिमत्त्व होते. जुन्या काळात त्यांच्या विद्वत्तेमुळे त्यांना सर्वत्र वकील साहेब या नावाने ओळखले जात असे. थेरगाव परिसरात अनेक कुटुंबांना स्थायिक करण्यामध्ये सुदामराव बारणे यांचा मोलाचा वाटा असून, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात त्यांनी सक्रिय योगदान दिले होते. तसेच योगिता ताई यांचे माहेर कासारवाडी येथील प्रतिष्ठित लांडे कुटुंब आहे. त्यांचे नाते विजू शेठ लांडे व विलास शेठ लांडे या सामाजिकदृष्ट्या व राजकीयदृष्ट्या प्रभावी कुटुंबाशी जोडलेले असून, त्यामुळे त्यांचा सामाजिक संपर्कक्षेत्र आणखी व्यापक आहे.
थेरगावमधील बारणे कुटुंब हे शेती, सामाजिक कार्य आणि बांधकाम व्यवसायात मोठे नाव असलेले प्रतिष्ठित घराणे म्हणून ओळखले जाते. त्यामुळे योगिता ताई बारणे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश हा केवळ पक्षप्रवेश न राहता, थेरगाव प्रभाग क्रमांक २३ साठी निर्णायक राजकीय टर्निंग पॉईंट मानला जात आहे. या प्रवेशासाठी माजी नगरसेवक कैलास बारणे यांनी पुढाकार घेत संघटनात्मक पातळीवर महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या या प्रयत्नामुळे प्रभाग क्रमांक २३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा पॅनल अधिक मजबूत होईल आणि आगामी महापालिका निवडणुकीत चारही उमेदवारांना मोठी संधी उपलब्ध होईल, असा विश्वास राजकीय निरीक्षकांकडून व्यक्त केला जात आहे.
योगिता ताई बारणे यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे स्थानिक पातळीवरील संघटन अधिक भक्कम झाले असून, आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादीचे पारडे थेरगावमध्ये निश्चितच जड झाले आहे, असे मत राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.



