भोसरीचिंचवडपिंपरीपुणेमावळ

मालमत्ताकर सवलतीचा लाभ घेण्यासाठी आज अखेरचा दिवस

पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज 

पिंपरी चिंचवड शहरातील मालमत्ताधारकांना 30 सप्टेंबरपर्यंत मालमत्ताकर ऑनलाईन भरल्यास सामान्यकरात चार टक्के सवलत आहे. त्या सवलतीचा लाभ घेण्याचा बुधवार (दि.30) हा शेवटचा दिवस आहे. तरी, मालमत्ताकर ऑनलाईन माध्यमातून भरून सवलतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेचे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केले आहे.

महापालिकेच्या कर संकलन विभागामार्फत मालमत्ताधारकांना मालमत्ताकराच्या ऑनलाईन भरण्यावर चार टक्के सवलत दिली जाते. ही सवलत 1 जुलै ते 30 सप्टेंबर 2026 या कालावधीत मालमत्ताकराचा ऑनलाईन भरणा करणार्‍या नागरिकांना लागू आहे. या तीन महिन्यांच्या कालावधीत 50 हजारांहून अधिक मालमत्ताधारकांनी 4 टक्के सवलतीचा लाभ घेतला आहे. ऑनलाईन कर भरण्याच्या सुविधेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

दरम्यान, 29 सप्टेंबरपर्यंत चार लाखांहून अधिक नागरिकांनी 601 कोटी रुपयांचा मालमत्ताकर भरला आहे. तीस सप्टेंबरनंतर थकीत मालमत्ताकराच्या वसुलीसाठी जप्तीची प्रक्रिया अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत मोठ्या प्रमाणात मालमत्ताकर थकीत असलेल्या औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र तसेच, इतर थकीत मालमत्तांवर नियमानुसार जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदार मालमत्ताधारकांनी संभाव्य कारवाई टाळण्यासाठी आपला थकीत मालमत्ताकर विहित मुदतीत भरावा, असे आवाहन कर संकलन विभागाने केले आहे.

एक ऑक्टोबरपासून मालमत्ता जप्तीची कारवाई 

मालमत्ताकराची थकबाकी असलेल्या नागरिकांनी 30 सप्टेंबरपूर्वी कराचा भरणा करून महापालिकेच्या वसुली कारवाई टाळावी. तीस सप्टेंबरनंतर मोठ्या प्रमाणात थकीत असलेल्या औद्योगिक, बिगरनिवासी, मिश्र आणि इतर मालमत्तांवर जप्तीची कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी कारवाईची प्रतीक्षा न करता थकीत कराचा भरणा तातडीने करावा. तसेच, चालू कराचा ऑनलाईन भरणा करून 4 टक्के सवलतीचा लाभ घ्यावा. वेळेत कर भरणे ही केवळ आर्थिक जबाबदारी नसून शहराच्या विकासात नागरिकांचा थेट सहभाग आहे, असे महापालिकेच्या कर संकलन विभागाचे उपायुक्त सचिन पवार यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button