
पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपमध्ये नवख्या नगरसेवकाची संख्या मोठी आहे. पक्षाच्या सर्व 84 नगरसेवकांना महापालिका कामकाज आणि शिस्तीचे धडे देण्यासाठी आयोजित केलेले निवासी प्रशिक्षण शिबिर अचानक रद्द करण्यात आले आहेत. प्रशिक्षणाचा दोनदा मुहूर्त हुकल्याने शिबिर होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
सत्ताधारी भाजपमध्ये असलेल्या गटतटामुळे वेगवेगळे प्रकरणे समोर येत आहेत. त्यामुळे नाहक भाजपची बदनामी होत आहे. सत्ता टिकवण्याबरोबरच पक्षांतर्गत शिस्त आणि समन्वय राखण्याचे आव्हान उभे राहिले आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवकांना पक्षाची विचारधारा, संघटनात्मक शिस्त व महापालिकेच्या कारभाराचे धडे देण्यासाठी भाजपकडून पाच आणि सहा ऑक्टोबरला निवासी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशिक्षणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: उपस्थित राहून नगरसेवकांना धडे देणार असून, पक्ष शिस्तीबाबत संवाद साधणार आहेत. मात्र, हे प्रशिक्षण अचानक रद्द करण्यात आल्याने नगरसेवकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
महापालिकेत भाजपने 84 जागांसह सत्ता दुसर्यांदा ताब्यात घेतली आहे. एवढे मोठे संख्याबळ मिळाल्यानंतर नगरसेवकांची वाढलेली राजकीय महत्वाकांक्षा, स्थानिक नेत्यांमधील मतभेद व गटतटाचे राजकारण यामुळे पक्षांतर्गत व्यवस्थापनाचा प्रश्न अधिक महत्वाचा बनला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांचे प्रशिक्षण भाईदर, मुंबई येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे होणार होते. या प्रशिक्षणास मुख्यमंत्री फडणवीस हे स्वत: उपस्थित राहणार होते. मात्र, हे प्रशिक्षण अचानक रद्द करण्यात आले. असा प्रकार दुसर्यांदा झाला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपच्या 84 नगरसेवकांना दोन दिवशीय निवासी प्रशिक्षण शिबिरात प्रशिक्षण दिले जाणार होते. त्यासाठी सर्वच नगरसेवक उत्सक होते. मात्र, अचानक शिबिर स्थगित झाल्याचे निरोप प्राप्त झाला आहे. लवकरच शिबिराची नवीन तारीख कळवली जाईल, असे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी सांगितले.



