चिंचवडपिंपरी

प्रशासकीय राजवटीत नामकरण धोरणास हरताळ

पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज 

पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रस्ते, चौक, उद्यान, क्रीडांगण, घाट, प्रवेशद्वार, बस थांबे, शाळा व इतर इमारतींचे नामकरण केले जाते. महापालिकेच्या वतीने नामकरणाचा निर्णय घेतला जातो. मात्र, प्रशासकीय राजवटीत असा निर्णय घेतला जात नसल्याने नामकरण धोरणास हरताळ फासला जात आहे.

रस्ते व चौकांना तसेच, महापालिकेच्या इमारतींचे नामकरण केले जाते. त्यासाठी महापालिका सर्वसाधारण सभेची मंजुरी घेतली जाते. मात्र, प्रशासकीय राजवटीत असे निर्णय घेतले जात नसल्याने नामकरणाचे अनेक प्रस्ताव रखडले आहेत. त्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे.

भीम संग्राम सामाजिक संघटनेतर्फे पिंपरी कॅम्प व काळेवाडीस जोडणार्‍या पुलाजवळील त्रेलोक्य स्मशानभूमी पञाशेड भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर रिक्षा स्टँड समोरील चौकास समाजसुधारक वामनदादा कर्डक यांचे नाव देण्यात यावे. तसेच, पिंपरी येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने असणार्‍या बस थांब्याला जाणार्‍या व शांतीवन बस थांब्याच्या जवळील चौकास संत कबीर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी महापालिका आयुक्त तसेच, ग क्षेत्रीय कार्यालयाकडे एका वर्षांपूर्वी करण्यात आली आहे.
मात्र, त्यावर कार्यवाही केली जात नाही. प्रशासकीय राजवटीत नामकरणाचा निर्णय घेतला जात नाही, असे आयुक्त शेखर सिंह यांनी स्पष्ट केले आहे. प्रशासकीय राजवटीत विशेष अधिकार्‍याचा वापर करून वरील दोन चौकांचे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी संघटनेचे राहुल वडमारे, आनंद साळवे, कैलास परदेशी, राजू चव्हाण यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button