मामुर्डी-सांगवडे पुल उभारण्यास मंजुरी; पिंपरी-चिंचवड महापालिका करणार 36 कोटी 66 लाखांचा खर्च

पिंपरी | निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने मामुर्डी-सांगवडे असा पवना नदी पात्रावर पुल बांधण्यात येणार आहे. त्यासाठी 36 कोटी 66 लाख 10 हजार रूपये खर्चास महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मंगळवारी (दि.21) मान्यता दिली आहे. हा पुलाच्या कामाची मुदत 12 महिने आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य ब मुख्यालयाच्या वतीने पुलाच्या कामासाठी 37 कोटी 25 लाख 91 हजार 366 रूपये खर्चाची निविदा 4 सप्टेंबर 2024 ला प्रसिद्ध केली होती. त्यासाठी 4 ठेकेदारांच्या निविदा प्राप्त झाल्या. त्यापैकी ए. आर. कन्स्ट्रक्शन व टी अॅण्ड टी इन्फ्रा लिमिटेड या दोन ठेकेदार कंपन्यांच्या निविदा पात्र ठरल्या. त्यातील 36 कोटी 66 लाख 10 हजार रूपये खर्चाची कमी दराची ए. आर. कन्स्ट्रक्शनची निविदा स्वीकृत करण्यात आली आहे. त्या खर्चास महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी स्थायी समितीची मान्यता दिली आहे. पुलाच्या कामाची मुदत 12 महिने आहे.
दरम्यान, मामुर्डी-सांगवडे असा पुल बांधण्याची अनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित होती. अखेर, हा पुला बांधण्यास मुहूर्त मिळाला आहे. या पुलामुळे मामुर्डी व सांगवडे तसेच, हिंजवडीकडे ये-जा करणे अधिक सुलभ होणार आहे. सध्या मामुर्डी-सांगवडेस जोडण्यासाठी पवना नदीवर लोखंडी पुल आहे. तो धोकादायक झाला आहे. त्या पुलावरून अवजड वाहनांना बंदी आहे. नव्या पुलामुळे येथून सर्व प्रकाराच्या वाहनांना ये-जा करता येणार आहे. तसेच, सांगवडे व हिंजवडी परिसराशी पिंपरी-चिंचवड शहराची कनेक्टीव्ही वाढणार आहे.
नव्या पुलामुळे वाहतूक करणे सुरक्षित होणार
मामुर्डी-सांगवडे पुलामुळे या पिंपरी-चिंचवड शहर आणि हिंजवडी असे दोन भाग जोडले जाणार आहे. त्यामुळे वाहतूक रहदारी सुलभ होणार आहे. या पुलावर अजवड वाहनांची वाहतूक होणार असल्याने नागरिकांना वाहतूक करणे अधिक सुरक्षित होणार आहे. महापालिकेने हा पुल मुदतीमध्ये पूर्ण करावा, असे बांधकाम व्यावसायिक बाळासाहेब औटी यांनी सांगितले.


