
निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य, नगर रचना आणि उद्यान विभागातील तीन लाचखोर अधिकार्यांचे सेवानिलंबन रद्द करण्यात आले आहे. त्यांची नव्या विभागात नेमणूक करण्यात आली आहे. तसा आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी काढला आहे. मुख्य आरोग्य निरिक्षक सुनील वाटाडे, अनुरेखक दिलीप आडे आणि सहाय्यक उद्यान निरिक्षक किरण मांजरे यांना वेगवेगळ्या प्रकरणात लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. हा प्रकार मार्च व जून 2023 या महिन्यात घडला होता. त्याच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने फौजदारी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर त्या तिघांना आयुक्त सिंह यांनी निलंबित केले होते.
या निलंबित कर्मचार्यांचा आढावा घेण्यासाठी ते प्रकरण निलंबन आढावा समितीसमोर सादर करण्यात आले होते. निलंबित कर्मचार्यांची विभागीय चौकशी तसेच, न्यायालयाच्या अंतिम निर्णयास अधिन राहून निलंब रद्द करून अकार्यकारी पदावर व जनसंपर्क येणार नाही, असा विभागात नेमरून करण्याची शिफारस समितीने केली होती. त्यानुसार आयुक्तांनी त्यांचे निलंबन रद्द केले आहे.
मुख्य आरोग्य निरिक्षक वाटाडे यांची आरोग्य विभागात, अनुरेखक आडे यांची निवडणूक आणि सहाय्यक उद्यान निरिक्षक मांजरे यांना उद्यान विभागाचे कामकाज देण्यात आले आहे.



