सत्ता स्थापन होण्यापूर्वीच प्रशांत शितोळे यांनी घेतला दालनाचा ताबा

पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची निर्विवाद सत्ता आली आहे. महापौर व उपमहापौर पदासाठी नगरसेवकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. अद्याप निमयानुसार महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापन झालेली नाही. असे असताना सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी दालनाचा ताबा घेतला आहे. अधिकार्यांच्या बैठका घेऊन त्यांना सूचना करण्याचे कामकाज सुरू केले आहे. त्यावरून महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.
तब्बल 9 वर्षानंतर महापालिकेची निवडणुकीसाठी 15 जानेवारी 2026 मतदान झाले. दुसर्या दिवशी 16 जानेवारीला मतमोजणी होऊन निकाल लागला. भाजपाने 128 पैकी 84 जागा महापालिकेची एकहाती सत्ता दुसर्यांदा काबीज केली आहे. भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेने विभागीय आयुक्तांकडून आपल्या गटाच्या नगरसेवकांची नोंदणी केली आहे. त्या संदर्भात अद्याप विभागीय आयुक्तांकडून महापालिका आयुक्तांना कळविण्यात आलेले नाही.
तसेच, महापौर व उपमहापौरांच्या निवडीसाठी शुक्रवारी (दि.6) विशेष सर्वसाधारण सभा होणार आहे. त्या दिवशी प्रशासकीय राजवट संपून प्रत्यक्षात लोकप्रतिनिधींची सत्ता सुरू होणार आहे. महापौरांच्या मार्फत संपूर्ण महापालिकेचे कामकाज सुरू होईल. महापौरांमार्फत सत्तारूढ पक्षनेता व विरोधी पक्षनेता निवडला जाईल.
भाजपाने अद्याप सत्ता स्थापन केलेली नाही. असे असताना भाजपाचे सत्तारूढ पक्षनेते प्रशांत शितोळे यांनी महापालिका भवनातील तिसर्या मजल्यावरील सत्तारूढ पक्षनेत्याच्या दालनाचा ताबा घेतला आहे. त्या दालनातून त्यांनी सोमवार (दि.2) पासून कामकाज सुरू केले आहे. दुसर्या दिवशी मंगळवारी (दि.3) ही दालनात अधिकार्यांच्या बैठका घेत त्यांनी कामकाज केले. अर्थसंकल्पात कोणत्या विभागास किती निधी दिला जाणार याची माहिती त्यांनी घेतली.
दरम्यान, महापालिका कामकाजातील नियमाची सत्तारूढ पक्षनेत्यालाच माहिती नसल्याबद्दल तसेच, सत्तारूढ पक्षनेत्याच्या दालनाचा ताबा आणि खुर्चीवर बसण्याची प्रशांत शितोळे यांच्याकडून घाई केली जात असल्याबद्दल महापालिका वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगली आहे.
महापालिकेत भाजपाची सत्ता आली आहे. सत्तारुढ गटनेता म्हणून माझी निवड झाली आहे. त्यानुसार मी कामकाज सुरू केले आहे. महापालिका विविध विभागांच्या अधिकार्यांशी चर्चा करून माहिती घेत आहे. मात्र, महापालिकेच्या संबंधित अधिकार्यांनी मला नियमाची माहिती दिलेली नाही. सहा फेबु्रवारीनंतर मी अधिकृतरित्या कामकाज सुरू करेन.
प्रशांत शितोळे, सत्तारूढ पक्षनेता, पिंपरी-चिंचवड महापालिका



