चिंचवडपिंपरीपुणेभोसरीमहाराष्ट्र

मनपात मोठा प्रशासकीय फेरबदल; एकाचवेळी २७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज 
क्षेत्रीय प्रशासनाच्या पुनर्रचनेसोबतच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी फेरबदल करण्यात आला आहे. नव्याने स्थापन करण्यात येत असलेल्या दोन क्षेत्रीय कार्यालयांच्या अंमलबजावणीपूर्वी मनपा प्रशासनाने एकाचवेळी २७२ कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले असून, यामुळे विविध विभागांच्या कामकाजाच्या रचनेत व्यापक बदल होणार आहेत.
या बदल्यांमध्ये ७५ कनिष्ठ अभियंते, ३६ उपअभियंते, १०३ लिपिक आणि ५८ मुख्य लिपिकांचा समावेश आहे. या निर्णयामुळे क्षेत्रीय कार्यालयांपासून ते तांत्रिक व प्रशासकीय शाखांपर्यंत कामकाजाचा नवा ढाचा तयार होणार असून प्रशासन अधिक गतिमान करण्याचा उद्देश यामागे आहे.
मनपा आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतलेल्या निर्णयानुसार, ८ प्रभाग समित्यांची पुनर्रचना करून आता १० क्षेत्रीय कार्यालये स्थापन करण्यात आली आहेत. १ जुलैपासून ही नवी रचना प्रत्यक्षात लागू होणार असून त्यानुसार कर्मचाऱ्यांचे पुनर्वितरण करण्यात आले आहे. या आदेशामुळे विविध विभागांच्या जबाबदाऱ्या आणि कार्यपद्धतीत महत्त्वपूर्ण बदल होणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
नव्या आदेशानुसार सर्व क्षेत्रीय कार्यालयांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक गड-किल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. यामध्ये ‘अ’ राजगड, ‘ब’ सिंहगड, ‘क’ विजयदुर्ग, ‘ड’ देवगिरी, ‘ई’ शिवनेरी, ‘फ’ तोरणा, ‘ग’ पुरंदर, ‘ह’ प्रतापगड, ‘ज’ रायगड आणि ‘ल’ लोहगड यांचा समावेश आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button