
पिंपरी । निर्भीडसत्ता न्यूज
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रारूप मतदार याद्या तयार करताना शिरूर, वडगाव शेरी, खडकवासला, पर्वती आणि हडपसर विधानसभा मतदारसंघांतून चिंचवड विधानसभा मतदार संघात 54 हजार 660 मतदार समाविष्ट केले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान 24 हजार 55 संशयास्पद मतदार वाढ झाली होती. त्याची पडताळणी करावी, अशी तक्रार महापालिकेचे माजी गटनेते राहुल कलाटे यांनी केली आहे. त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर व अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्याकडे तक्रार केली आहे. तसेच, राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
याबाबत राहुल कलाटे म्हणाले की, यादीमध्ये गंभीर अनियमितता आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात विधानसभेच्या निवडणुकीत 31 ऑगस्ट ते 1 ऑक्टोबर 2024 या एका महिन्यात 24 हजार 55 संशयास्पद मतदार वाढ झाली होती. त्यापैकी वाकड प्रभाग क्रमांक 25 मध्ये 4 हजार 734 मतदार समाविष्ट केले होते. तर, 6 हजार 390 दुबार मतदार आहेत. अनेक मतदारांचे ओळखपत्र एपीक क्रमांकसारखे असून, ते दोन किंवा तीन वेळा यादीत आढळतात. अशा सर्व पुनरावृत्त मतदारांची चाचणी करावी. कोणत्याही प्रभागात असले तरी हे मतदार यादीतून वगळावेत.
ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर केवळ सहा महिन्यांत चिंचवड मतदारसंघातील 9 हजार 302 नावे यादीतून वगळली. या मतदारसंघात इतर विधानसभा मतदारसंघांतील मतदार समाविष्ट केले आहेत. शिरूर मतदार संघातील 10 हजार 230, वडगाव शेरी 11 हजार 64, खडकवासला 12 हजार 330, पर्वती 8 हजार 238 आणि हडपसर 12 हजार 798 मतदार संघातून चिंचवड मतदार संघात समाविष्ट केलेल्या मतदारांची एकूण संख्या 54 हजार 660 आहे.
चिंचवड मतदार संघांत एकूण दुबार मतदार 9 हजार 770 आहे. प्रभाग क्रमांक 25 मध्ये 2 हजार 76 दुबार मतदार आहेत. त्यांना मतदार यादीतून वगळण्यात यावे. सन 2024 मध्ये डिलीटेड म्हणून वगळलेल्या मतदारांपैकी पुन्हा 106 मतदान आले आहे. प्रभाग क्रमांक 25 मधील वाकड गावठाण, दत्त मंदिर रस्ता, सुदर्शन कॉलनी 1 ते 6, सद्गगुरू कॉलनी 1 ते 2, काळाखडक परिसर येथील मूळ रहिवाशांची नावे चुकीच्या पद्धतीने प्रभाग क्रमांक 26 मध्ये स्थलांतरित केली आहेत.



